अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच इंधन दरवाढीच्या विरोधात देशाच्या पंतप्रधानांना थेट कुरियरद्वारे गोवऱ्या पाठविल्या होत्या. हा सबंध राज्यात चर्चेचा विषय झाला होता.
आता काँग्रेसच्या महिलांनंतर नगर तालुक्यातील विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून इंधन दरवाढीच्या विरोधात त्यांनी पेट्रोल पंपासमोर निदर्शने केली आहेत. यावेळी बोलताना विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुजित जगताप म्हणाले की, इंधन दरवाढीचा फटका विद्यार्थ्यांना देखील बसला आहे.
नगर शहरासह तालुक्याच्या विविध गावांमधून मुले महाविद्यालयीन, तसेच उच्च शिक्षणासाठी शहरात येत असतात. कोरोनामुळे महाविद्यालयांचे कामकाज जरी सुरळीतपणे सुरु नसले तरी देखील शैक्षणिक कामानिमित्त विद्यार्थ्यांना शहरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.
दुचाकी वर प्रवास करणे आता उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पॉकिटमनीच्या बजेटच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पूर्वी एक लिटर मध्ये एक-दोन वेळा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी लागणारा खर्च आता दुपटीवर गेला आहे.
त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये देखील इंधन दरवाढीबद्दल मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. महागाई वाढली आहे. गॅस दरवाढ झाली आहे. एका बाजूला पारंपरिक पद्धतीने वृक्षतोड करत चुलीवर स्वयंपाक करण्याच्या प्रकाराला बंदी घालण्यासाठी शासन वेगवेगळ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करत असत.
मात्र त्याच वेळेला स्वयंपाकाच्या गॅसचे दर हे आता हजार रुपयांना जाऊन भिडले आहेत. आमच्या माता, भगिनींनी घर चालवायच कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
हे आम्हा विद्यार्थ्यांना हताशपणे पहावे लागत आहे. या विदारक परिस्थितीला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप यावेळी जगताप यांनी केला आहे.