अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- काही वर्षांपूर्वी केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाने अख्खा नगर जिल्हा ढवळून निघाला होता. दरम्यान या घटनेतील मुख्य फरार आरोपी सुवर्णा कोतकरला व इतर आरोपींना अटक झालेली नाही.
त्यामुळे त्यांचा कसून शोध घेऊन तातडीने आरोपींना जेरबंद करावे. तसेच या खटल्यात उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी नगरसेविका सुनीता संजय कोतकर यांनी सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महानगरपालिकेत पोटनिवडणुकीत 2018 मध्ये माझे पती व शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल झाले. चार्जशीट दाखल झाल्यापासून सुवर्णा कोतकर, औदुंबर कोतकर व इतर आरोपी फरार झाले.
या घटनेला दोन वर्षे उलटून गेली आहेत. सुवर्णा कोतकरचा जामीन फेटाळला असला तरी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, त्यांना कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. असे निवेदनात म्हटले आहे.