अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अगस्तीचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य म्हणून प्रबोधन मोहिमेला तात्पुरती स्थगिती देत असून व्यवस्था परिवर्तनाची लढाई मात्र नेटाने पुढे घेऊन जाणार असल्याचे समन्वय समितीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा बैठकीत जाहिर केले.
येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीस आ.डॉ किरण लहामटे,जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत,बी.जे.देशमुख कारभारी उगले,बाजीराव दराडे,मारुती मेंगाळ,पोपट येवले,विनय सांवत आदी उपस्थित होते.
चर्चेनंतर समन्वय समितीने भुमिका स्पष्ट करताना सांगितले,अगस्ती कारखान्याची वास्तव आर्थिक परिस्थिती सभासदांच्या समोर ठेवण्यासाठी समन्वय समितीच्या वतीने तालुक्यातील प्रबोधन मोहीम सुरू करण्यात आली होती. जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत व बी. जे. देशमुख यांनी याकामी पुढाकार घेतला होता.
कारखान्यावर वाढत जाणारे कर्ज, ऊस तोडणी व्यवस्थापनातील त्रुटी, इथेनॉल प्रकल्प उभारणीतील विसंगत व संशयास्पद बाबी यासह अनेक मुद्यांवर या प्रबोधन मोहिमेद्वारे व्यापक चर्चा घडवून आणली जात होती. कारखान्याचे वास्तव आर्थिक चित्र यामुळे सभासदांच्या समोर येत होते.
शेतकरी,सभासद व कामगारांमध्ये यातून एक सकारात्मक व परिपक्व चर्चा होऊन यातून कारखाना अधिक कार्यक्षमतेने व काटकसरीने चालविला जावा यासाठी ही प्रबोधन मोहीम सुरू होती. कारखान्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे सत्य तथ्य या मोहिमेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले जात होते.
मात्र या मोहिमेमुळे कारखान्याचा पुढील गाळप हंगाम सुरू करण्यात अडचणी येत आहेत असा प्रचार कारखाना सत्ताधाऱ्यांकडून सुरू झाला. सभासद व शेतकरी व कामगारांमध्ये यामुळे गैरसमज पसरत होते. संबंधितांना असे गैरसमज पसरवणे शक्य होऊ नये व नवा गळीत हंगाम सुरू करण्यास सहकार्य व्हावे,
यासाठी प्रबोधनाची ही मोहीम पुढील तीन महिने स्थगित करावी व आपल्या मुद्यांवर कायम राहत, हंगाम पार पडे पर्यंत संयम बाळगावा अशी मध्यस्थी आ. डॉ. किरण लहामटे यांनी संपन्न झालेल्या बैठकीत केली. प्रबोधन मोहीमेत मांडलेल्या आपल्या मुद्यांवर ठाम राहत, मात्र लोकप्रतिनिधींच्या माध्यस्थीला मान देत,
प्रबोधन मोहीम पुढील तीन महिने स्थगित करण्यास संबंधित नेत्यांनी मान्यता दिली.शिवाय कारखान्याला कर्ज मिळावे यासाठी व हंगाम सुरू व्हावा यासाठी लागणारे सहकार्य करण्याची तयारीही संबंधितांनी व्यक्त केली.
हंगाम सुरू होण्यात आमचा अडथळा नसेल, असलेच तर सहकार्य असेल असे यावेळी बी. जे. देशमुख व दशरथ सावंत यांनी जाहीर केले.