अहमदनगर जिल्ह्यातील त्या जवानाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील व भारतीय सैन्यामध्ये कार्यरत शहीद जवान सुभेदार राजेंद्र पांडुरंग खुळे (वय ४५) यांचे रविवारी दि.६ रोजी पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

त्यांच पार्थिव जम्मू येथून रात्री त्यांच्या मूळ गावी लिंपणगाव अंतर्गत असणाऱ्या मुंढेकरवाडी येथे रात्री दहा वाजता दाखल झाल. मुंढेकरवाडीच्या प्राथमिक शाळेत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले, त्यानंतर काल बुधवारी दि.९ रोजी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी वीर जवान राजेंद्र खुळे अमर रहेच्या घोषणेने मुंढेकरवाडी व लिंपणगाव परिसर दणाणून गेला होता. शहीद खुळे यांच्या पार्थिवाचे अनेक आबालवृद्धांनी दर्शन घेतले. यावेळी पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण दिसून येत होते.

त्यांचे चिरंजीव शिवम खुळे, कन्या कृतिका खुळे आणि शिवानी खुळे यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग दिला. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील व शिरूर ,पारनेर, कर्जत, नगर तालुक्यातील आजी माजी सैनिक तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी आ.बबनराव पाचपुते, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भोसले, केशवराव मगर,

माजी सैनिक विठ्ठल जाधव, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संदीप सांगळे, प्रांत अधिकारी स्वाती दाभाडे, श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले आदींनी शहीद खुळे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र वाहिले.

त्यानंतर नगर येथील सैन्यातील जवानांनी त्यांना मानवंदना दिली. त्यांचे कुटुंबीय, आई छबुबाई तसेच मित्र परिवार आदींनी उपस्थित राहून सुभेदार खुळे यांना यावेळी अखेरचा निरोप दिला.

अहमदनगर लाईव्ह 24