आत्महत्या केलेल्या ‘त्या’ मुलावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-  शेवगाव शहरातील मिरी रस्त्यावरील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेणाऱ्या आदेश विजय म्हस्के ( वय-१८), रा. पवार वस्ती, शेवगाव या विद्याथ्र्याने वर्गामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार गुरुवार ता.२५ रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थी वर्गात आले असता, शेजारच्या वर्गात गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती विद्यालयाचे प्राचार्य करमसिंग वसावे यांनी पोलिसांना दिली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, काल बुधवार ता.२४ रोजी अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेणारा आदेश म्हस्के हा महाविद्यालयात नेहमीप्रमाणे आला. दुपारी १२ वा. महाविद्यालय सुटल्यानंतर तो विद्यार्थ्यांबरोबर घरी निघून गेला.

घरी गेल्यानंतर जेवण करून दोन तीन दिवस शाळेत येणार नाही, अशी शिक्षकांकडून परवानगी घेऊन येतो, असे आई लक्ष्मीबाई यांना सांगून तो घरामधून बाहेर पडला. बाहेर जाताना त्याने त्याचा मोबाईल घरीच ठेवला व आईचा स्कार्प बरोबर घेऊन गेला.

मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने आई व नातेवाईकांनी परिसर व महाविद्यालयात जाऊन शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे आई लक्ष्मीबाई यांनी काल बुधवार ता.२४ रोजी रात्री ११ वा.मुलगा हरवल्याची शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दुसऱ्या मजल्यावर दोन वर्ग असून, एक बंद तर एका वर्गात ११ वीचा वर्ग भरतो. आज गुरुवार ता.२५ रोजी सकाळी आठ वा. महाविद्यालयात नेहमीप्रमाणे विद्यार्थी वर्गात आले.

काही विद्यार्थ्यांना शेजारच्या बंद वर्गात कोणी तरी स्कार्पच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. प्राचार्य, उपप्राचार्य व इतर शिक्षकांनी खात्री करून पोलीसांना माहिती दिली.

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोना. अभिषेक बाबर, रामहरी खेडकर हे घटनास्थळी दाखल झाले.

विद्यार्थ्यांच्या व नातेवाईकांच्या समक्ष पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सायंकाळी आदेशवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. .

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24