अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.
जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यिय समिती गठित केली आहे. त्या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखयांनी दिली.
नगर मनपाच्या नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी शुक्रवारी मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत महापौर पदाचा पदभार घेतला. यानंतर मंत्री गडाख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील सरकारच्या काळात जलयुक्त शिवार अभियानातून कामे करण्यात आलेली होती.
त्या कामाच्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कॅगने अहवाल दिल्यानंतर या योजनेमध्ये जी कामे झाली, त्यातील 70 टक्के कामांमध्ये अनियमितता असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुमारे दोन हजार कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या प्रकरणाची खुली चौकशी करावी, अशी शिफारस समितीने सरकारकडे केली होती. काही ठिकाणी ही चौकशी झाली आहे. कामाचा दर्जा तसेच निकष या सर्व बाबींची पडताळणी करून ती समिती आपला अहवाल देणार आहे.
अंतिम अहवाल दिल्यानंतरच पुढील कारवाई निश्चतपणे केली जाईल, असेही मंत्री गडाख यांनी यावेळी सांगितले.
राज्यामध्ये त्यावेळेला नऊ हजार कोटी रूपयांचा खर्च जलसंधारण विभागाच्या अभियानावर झाला होता. अनेक जिल्ह्यातून या कामांच्या तक्रारी आलेल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.