अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- आमदार नीलेश लंके यांच्यावर ध्वनिफीतीद्वारे विविध आरोप करणाऱ्या तहसीलदार ज्याेती देवरे यांच्या विरोधातील चौकशी अहवाल उजेडात आल्यानंतर अडचणीत सापडलेल्या देवरे यांच्या अडचणीत महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने आणखी वाढ झाली आहे.
तसेच अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत कर्मचाऱ्यांनी कारवाई केलेली वाहने कुठलाही शासकीय दंड वसूल न करता सोडून देण्यात आलेली आहेत. याचे पुरावे सादर करण्यात येऊन देवरे यांनी कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप महसूल व तलाठी संघटनेने निवेदनाद्वारे केला आहे.
पारनेर तालुका महसूल संघटना व तलाठी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार ज्योती देवरे या राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्यासारखे वागतात. त्यामुळे खालच्या कर्मचाऱ्यांना बरे वाईट परिणामांना तोंड द्यावे लागते. तसेच कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देत असतात.
त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची तालुक्यात काम करण्याची मानसिकता राहिली नाही. त्यांची तालुक्यातून बदली करावी, अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा पारनेर तालुका महसूल संघटना व तलाठी संघटनेने दिला.
तसेच कर्जुले हर्या येथील संपत भागाजी आंधळे यांना गट नंबर ६७ मध्ये राहिवाशी प्रयोजनासाठी सनद दिली. मात्र, सनद देताना भूमी अभिलेख अथवा सहायक संचालक नगर रचना विभाग यांचा अभिप्राय घेतला नाही.
त्याविरोधात अरुण आंधळे यांनी उपोषण केल्यानंतर कर्जुले येथील महिला तलाठी लता निकाळजे यांना कार्यालयात तसेच घरी बोलावून सदर गट हा गावठाण हद्दीपासून २०० मीटरच्या परिघात येत नसतानाही तसा दाखला देण्याबाबत दबाव टाकला. निकाळजे यांना निलंबित करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.