अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- खतांचा निम्मासाठा कमिशनसाठी मुळा बाजार कडे घेणाऱ्या मंत्री शंकरराव गडाख यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, अशी टीका महाराष्ट्र भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे या वर्षी शासनाने खरीप हंगाम साठी खताची जी मंजुरी दिली आहे, त्या मंजुरी मध्ये २ लाख ११ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला मंजूर केलेले आहे.
त्यात ८२ हजार टन युरिया हा जिल्ह्याला मंजूर झालेला आहे. मात्र आज या प्रमाणे कुठलाही युरियाचा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही. नेवासे तालुक्यामध्ये नियमाप्रमाणे १० हजार टन खरीप साठी युरिया जर मंजूर झालेला असेल व त्यामध्ये संरक्षित (बफर साठा) १५०० मेट्रिक टन युरिया हा मंजूर असतानाही तालुक्यात कुठेही युरिया उपलब्ध नाही.
विशेष म्हणजे आतापर्यंत तालुक्यासाठी जो युरिया, विविध खत कंपन्याने पुरवठा केलेला आहे, त्यातील निम्मा (५० टक्के) युरिया साठा हा मंत्री महोदयांनी स्वतः च्या मुळाबाजारासाठी घेतलेला आहे व उर्वरित निम्मा (५० टक्के) साठा पूर्ण तालुक्यासाठी दिलेला आहे.
आज तालुक्यामध्ये कुठेही युरिया शिल्लक नसतांनी मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी मुळा बाजारमधून दोन तीन गोण्या उपलब्ध करून देण्या बाबत पत्रक बाजी करत आहेत. शेतकऱ्यांना दोन-दोन, तीन-तीन गोण्यासाठी नेवाशाला अथवा सोनईला स्वखर्चाने मूळ बाजारात जावे लागेल.
हा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्याऐवजी प्रत्येक गावामध्ये युरिया उपलब्ध करून द्यावा. मुळा बाजाराच्या मिळणाऱ्या कमिशन साठी धडपड करण्या पेक्षा, मंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना भेटून युरियाची टंचाई दूर करावी मंत्र्यानी जनतेला न फसवता प्रत्येक गावामध्ये युरिया उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन महाराष्ट भाजप किसान मोर्चा उपाध्यक्ष माजी आमदार मुरकुटे यांनी केली आहे.
नेवासे तालुक्यामध्ये खताची विशेषत: युरिया खात्याची टंचाई आहे. तालुक्यातील शेतकरी श्रीरामपूर गंगापूर शेवगाव नगर राहुरी या लगतच्या तालुक्यातून मुबलक मिळणारा युरिया घेऊन येत आहे पण आपल्याच तालुक्यात खताची टंचाई का हा मोठा प्रश्न आहे या प्रश्नावर आंदोलन करण्यात येणार आहे.