अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत भोंदूगिरी करत एकास तब्बल साडेचार लाख रुपयांना गंडा घातला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथे घडली.
या प्रकरणी करमाळा येथील दत्तात्रय शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनगुन्हा दाखल करत अवघ्या चार दिवसात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. तसेच त्यांच्याकडून एकूण ४ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील ताब्यात घेतला.
संतोष साहेबराव देवकर , अशोक फकिरा चव्हाण अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, करमाळा येथील दत्तात्रय शेटे या इसमाला देवकर व चव्हाण या भोंदूबाबानी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना चार दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाट्यावर घडली होती.
या घटनेबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलिस याबाबत तपास करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, हा गुन्हा थेऊर येथील संतोष साहेबराव देवकर व त्याचा साथीदार अशोक फकिरा चव्हाण या दोघांनी केल्याचे समजले.
या माहितीच्या आधारे श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या पथकाने या भोंदूबाबांना थेऊर येथे जाऊन जेरबंद करत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करत पावणेतीन लाख रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण ४ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.