शहरातील गणेश मंडळांना १० बाय १० आकाराचे मंडप उभारण्यास परवानगी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :-  कोरोनामुळे गणेश मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या आकारावरही यंदा मर्यादा आली आहे. महापालिकेने शहरातील गणेश मंडळांना १० बाय १० आकाराचे मंडप उभारण्यास परवानगी दिली असून, ६० टक्के रस्ता वाहतुकीसाठी मोकळा ठेवण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे.

आज शुक्रवारी (ता. १०) शहरात सार्वजनिक ठिकाणी, घरोघरी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होत आहे. सध्या कोरोनाचे सावट असल्याने शासनाने कडक निर्बंध लावले आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंडप उभारण्यासाठी नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिकेने गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबविली होती. या योजनेंतर्गत अतिक्रमण विभागाने गुरुवारी दिवसभरात ८४ सार्वजनिक मंडळांना परवानगी दिली. गतवर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मंडळांना परवानगी दिली नव्हती.

महापालिकेने अग्निशमन व नगररचना या दोन्ही विभागांची ना-हरकत घेऊन मंडळांना परवानगी दिली. यापूर्वी पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, धर्मादाय सहायक आयुक्तांचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतर परवानगी दिली जात होती. चालूवर्षी इतर विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र न घेता महापालिकेने परवानगी दिली असून, वाहतुकीसाठी रस्ता खुला ठेवून मंडप उभारण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान सन २०१९ मध्ये २७२ सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेतली होती. पाहणी पथक…. मंडप परवानगी देण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या पथकाद्वारे शहरात उभारण्यात आलेल्या मंडपांची पाहणी करण्यात येणार आहे.

संबंधित मंडप उभारणीसाठी परवानगी घेतली आहे का, मंडप परवाना दर्शनी भागात लावला आहे का, जेवढ्या जागेवर मंडप उभारण्यास परवानगी दिली होती, तेवढ्याच जागेवर तो उभारण्यात आला आहे का, याची तपासणी हे पथक करणार आहे. त्यानंतर विनापरवाना उभारण्यात आलेल्या मंडपांची यादी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office