Ganesh Visarjan at Home: घरीच गणपती विसर्जन कसे करतात?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोना संकटाचे सावट होतेच. त्यामुळे गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या.(Ganesh Visarjan at Home: How to do Ganpati Visarjan at home)

त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क होते. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच आज अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

गणपती विसर्जन पूजा विधी
सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचार पूजा करावी.
गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा.
गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत.
एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यावेत. या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात.
विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जयजयकार करावा.

गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी.
गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात.

पूजा पूर्ण झाल्यावर प्रार्थना करावी व विसर्जनासाठी
“यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।”

घरातील ज्येष्ठ व्यक्ती गणपतीच्या विसर्जनापूर्वी मंत्रोच्चाराने बाप्पाच्या मूर्ती मध्ये केलेली प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातील देवत्त्व काढून घेतात. निरोपाची एकत्र आरती म्हणून बाप्पाला विसर्जनाला नेले जाते.

दरम्यान घरच्या घरी मोठा टब, बादली, घंघाळामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यापूर्वी त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळद-कुंकू, फुलांच्या पाकळ्या, गंगेचे पाणी मिसळून ठेवा. विसर्जनाची मूर्ती 3 वेळेस पाण्यात भिजवून नंतर पूर्ण मूर्ती बुडवा.

गणेश विसर्जनानंतर पाटाची पुन्हा आरती करून नैवेद्य, प्रसादाचे वाटप करून श्रीगणेशाला अखेरचा निरोप द्या. बाप्पाला निरोप देताना दही-भाताचा नैवेद्य शिदोरी म्हणून सोबत देण्याची प्रथा आहे.