गणेशोत्‍सव : सार्वजनिक गणेश मंडळांच्‍या परवानगीसाठी मनपाने केली ‘ही’ सुविधा..!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- महानगरपालिका हद्दीत शहर व उपनगरात सार्वजनिक गणेशोत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. कोरोनामुळे उदभवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍याचा शासनाने जाहिर केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्‍सवासाठी गणेश मंडळांनी मनपा व स्‍थानिक प्रशासन यांची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहिल. श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळा करिता ४ फुट उंच व घरगुती गणपती करिता २ फुटापर्यत असावी.

यावर्षी शक्‍यतो पारंपारिक गणेश मुर्ती ऐवजी घरातील धातू ,संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडू मातीची पर्यावरण पुरक असल्‍यास मुर्तीचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या घरी करावे.

विसर्जन घरी करणे शक्‍य नसल्‍यास जवळच्‍या कुत्रिम विसर्जन स्‍थळी विसर्जन करावे. मनपाच्‍या वतीने गणेश मंडळांना लवकरात लवकर मंडप परवानगी मिळण्‍यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्‍या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्‍यात आली आहे.

गणेश मंडळांनी मा.धर्मदाय आयुक्‍त यांचेकडील नोंदणी प्रमाणपत्र, संबंधीत पोलिस स्‍टेशनचा नाहरकत दाखला, शहर वाहतुक नियंत्रण शाखा यांचा नाहरकत दाखला, हे दाखले घेवून मनपात अर्ज दाखल करावा.

मनपाच्‍या अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला, नगररचना विभागाकडील नाहरकत दाखला, बांधकाम विभागाकडील नाहरकत दाखला हे एकाच जागेत देण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.

सदर कागदपत्रांची पुर्तता करून मा.आयुक्‍त, अ.नगर मनपा यांचे नांवे अतिक्रमण निर्मुलन विभाग, नगर औरंगाबाद रोड, प्रशासकीय इमारत अहमदनगर महानगरपालिका या ठिकाणी लेखी अर्ज परवानगी घेण्‍यासाठी सादर करावा.

संबंधीत विभागास गणेश मंडळाच्‍या आलेल्‍या अर्जानुसार परवानगी देण्‍याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सुचना महापौर शेंडगे यांनी दिल्‍या आहेत.

Ahmednagarlive24 Office