अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- यावर्षीही गणेशोत्सव उत्सव निर्बंधातच साजरा करावा लागण्याची शक्यता आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना तसे संकेत दिले आहेत.
राज्यात २५ जिल्ह्यांमधील निर्बध राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र करोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने राज्य सरकार वारंवार खबरदारी घेण्याचं आवाहन करत आहे.
गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे सांगतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सव निर्बंधातच साजरा करावा लागेल असे संकेत दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व पंढरपूरचा दाखला देत पवार म्हणाले जिथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तिथं पॉझिटिव्हिटी रेट सात टक्क्यांच्या आसपास आहे.
तर जिल्ह्यातल्या अन्य ठिकाणी जिथं गर्दी नव्हती तिथं हा दर एक टक्क्याच्या आत आहे. त्यामुळे उत्साहाला आवर घालण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले. दरम्यान पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तसंच पुण्यातील हॉटेल-रेस्तराँ सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ‘ पण मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार असून जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे.