अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने मुंबईसह संपूर्ण राज्यभरात निरोप देण्यात आला. ‘मुंबईत दिवसभरात शांततेत विसर्जन पार पडले.

मात्र, सगळीकडे भक्तिमय वातावरण असताना राज्यात काही ठिकाणी या विसर्जनाला गालबोट लागले. मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी रात्रीच्या सुमारास 5 मुले बुडाली.

त्यातील दोन मुलांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून, उर्वरित तीन मुले अजून बेपत्ता आहेत. स्थानिक पोलीस, पालिका, अग्निशामक दल आणि तटरक्षक दलाच्या माध्यमातून या बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे.

तसेच नौदलाचीही मदत घेण्यात येत आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे मुलांचा शोध घेण्यात अडथळा येत आहे. पालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनादरम्यान अंधेरीच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली.

विसर्जन करत असताना 5 मुले खोल समुद्राच्या दिशेने गेली. त्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले पाण्यामध्ये बुडाली.

ही घटना निदर्शनास येताच तेथील स्थानिक रहिवाश्यांनी तात्काळ धाव घेऊन मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी दोघांना वाचवण्यात आले, मात्र 3 मुलांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही.

बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने गणपती विसर्जनादरम्यान तैनात केलेल्या जीवरक्षक तसेच अग्निशमन दलाच्या साहाय्याने बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे.