अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपुरातील आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा निर्णय घेऊ नये, श्रीरामपूरच जिल्हा करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
तसेच आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे विभाजन केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला.
श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यानंतर संगमनेरचे नाव पुढे करण्यात आले. श्रीरामपूर की संगमनेर? या वादात 30 वर्षे निघून गेली.
मात्र जिल्ह्याचे विभाजनही झाले नाही आणि मुख्यालयाचा प्रश्नही तसाच राहिला. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी या ठिकाणी जिल्हा कोर्ट, आरटीओ कार्यालय, एमआयडीसी,
मोठी प्रशासकीय इमारत, जिल्हा उपग्रामीण रुग्णालय, एस. टी. कार्यशाळा यासह अनेक सरकारी कार्यालये कार्यान्वित आहेत. रेल्वेची सुविधा असणार्या श्रीरामपूर शहराच्या अगदी लगत
शेती महामंडळाची शेकडो एकर जमीन जिल्हा वाढीसाठी तसेच सरकारी कार्यालये, निवासस्थानांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे श्रीरामपूरच जिल्ह्यासाठी योग्य असे ठिकाण असल्याचे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.