दुधाला पाच रुपये अनुदान द्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-टाळेबंदीच्या नावाखाली राज्य सरकारने दुधाचे भाव पाच रुपयांनी कमी केल्याने दूधउत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

दूधउत्पादकांना आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी सरकारने सरसकट पाच रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात कानवडे यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवकांना तारणहार ठरणारा दुग्धव्यवसाय आहे;

पंरतु राज्य सरकार व सहकारी दुधसंस्था, खासगी दुधसंस्था या दुध धंद्यातील मलई खाण्याचे काम करतात आणि शेतकरी मात्र काबाडकष्ट कष्ट करुन कर्जबाजारी होत आहेत.

यातून सावरण्यासाठी महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात यावे.

खासगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दुधाचे भाव पाच रुपयांनी कमी करुन २२ ते २५ रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा भागू शकत नाही.

पशुखाद्य सरकी पेंडचा भाव २०ते २१ रूपये होता. तो आता ३० रुपये झाला आहे. मका १२ रुपये किलो होती. ती आता १८ रुपये किलो झाली आहे.

सोयाबीन चार हजार रुपये भाव होता. तो आता ७ हजार रुपये झाला आहे. पशूखाद्याचे भाव गगणाला भिडले आहे. दुभत्या जनावरांना ऐवढा मोठा खर्च होतो.

सर्व खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक रहात नाही. राज्य सरकारने किमान पाच रुपये प्रतिलिटर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे,

अन्यथा शेतकरी टाळेबंदीचे नियम मोडून रस्त्यावर येईल, दुधसंकलन केंद्रावरुन दुधाची वाहतूक ठप्प करू, असा इशारा कानवडे यांनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24