अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल, यासाठी सर्वजण तुमच्या समवेत असल्याचा दिलासा माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कोविड रुग्णालयात बेडची संख्या वाढवितानाच सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय विनाविलंब घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
पालकमंर्त्यांच्या दौऱ्यानंतर आमदार विखे पाटील यांनी शिर्डी येथे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
वाढत चाललेली रूग्णसंख्या, कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, आरोग्य सुविधांवर असलेला ताण विचारात घेऊन करावे लागणारे नियोजन यासंदर्भात त्यांनी महसूल व वैद्यकीय विभागाचे अधिकारी,
शिर्डी संस्थानचे प्रतिनिधी यांच्याशी विचारविनीमय करून तातडीने अंमलबजावणी करण्याचे सूचित केले. यापूर्वी अधिकारी, कर्मचारी यांनी मागील वर्षभरात एकत्रितपणे केलेल्या उपाययोजनांमुळे हे संकट रोखण्यात यश आले;
परंतु या संकटाचे दुसरे संक्रमण सुरू झाल्यानंतर रुग्णांची वाढलेली संख्या ही सर्वाच्याच दृष्टीने चिंतेची असली तरी रुग्णांना मदतीसाठी तत्पर राहावे लागेल, असे स्पष्ट करून आ.विखे पाटील म्हणाले की,
संस्थानच्या रूग्णालयात अधिकच्या बेडची उपलब्धता करताना ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटरची संख्या वाढविण्यासाठी यापूर्वी झालेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय इथे उपलब्ध असलेल्या आरोग्य साधनांचा आढावा आ.विखे पाटील यांनी या बैठकीत घेतला.