अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- एनसीबी मुंबईने एक मोठी कामगिरी केली आहे सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे मात्र, या महिलांनी सोनं तस्करीसाठी अवलंबलेला मार्ग पाहून पोलिसही चक्रावले.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एनसीबीने ही मोठी कारवाई केली. यावेळी संशयीतरित्या फिरणाऱ्या 3 केनियाच्या महिलांना अडवले. यावेळी त्यांची चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या महिलांनी योनी आणि गुदाशयातील पोकळीमध्ये सोनं लपवल होते.
चौकशीदरम्यान या महिलांकडून एकूण 17 तोळे सोन्याची 3 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. एकूण 937.78 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी प्रकरण सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना काही महिला परदेशातून ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार समीर वानखेडे आणि त्यांचं पथक विमानतळावर पाळत ठेवून होतं. दोहा येथून मुंबईत येणाऱ्या विमानात या व्यक्ती असल्याची माहिती होती. त्यानुसार तीन महिला आल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आरोपी महिलांना मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन चौकशी केली असता
त्यांनी आपल्याला त्रास होत असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर या महिलांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली. यावेळी त्या महिलांनी खरी परिस्थिती सांगितली. या महिलांनी त्यांच्या गुप्तांगात वस्तू लपवली असल्याचं सांगितलं.
डॉक्टरांच्या मदतीने त्या लपवलेल्या वस्तू काढण्यात आल्या. काढण्यात आलेली वस्तू हे सोनं होत. त्या तीन महिलांकडून 938 ग्राम सोनं जप्त करण्यात आलं आहे. 13 पाकिटात सोन्याचे 17 तुकडे लावण्यात आले होते. हे तुकडे 20 ग्राम ते 100 ग्रामचे होते.