अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाची अॅन्टीजेन चाचणीचा रिपोर्ट तब्बल एक महिन्यानंतर मिळाला.
मात्र तोपर्यंत त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर असे की, जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका वृद्ध व्यक्तीला दि. १६ मार्चच्या दरम्यान ताप, सर्दी व कफचा त्रास होऊ लागला.
स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले त्यानंतर श्रीरामपूर येथील डॉक्टरांना दाखविले. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने आरटीपीसीआर तपासणी केली त्या तपासणीचा स्कोअर वाढलेला होता.
त्यामुळे कुटुंंबियांनी त्यांना दि. १८ मार्च रोजी अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
तेथेही त्यांची अॅन्टीजेन चाचणीसह आरटीपीसीआर तपासणी झाली तेव्हापासून त्यांच्या कुटुंबियांना अद्याप अहवाल आलाच नव्हता.
अखेर दहा दिवसांच्या उपचारादरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी रिपोर्टची चौकशी केली पण त्यांना ‘अद्याप रिपोर्ट आला नाही’, असे उत्तर मिळाले.
सदर व्यक्तीची तपासणी दि.१८ मार्च रोजी झाली आणि तब्बल तीस दिवसांनंतर म्हणजे काल दि.१७ एप्रील रोजी आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या यादीत संबंधित वृद्धाचा अहवाल पॉझीटिव्ह आला.
म्हणजेच सदरची व्यक्ती उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तीस दिवसांनी व ती व्यक्ती मयत झाल्यानंतर २१ दिवसांनी अहवाल मिळाल्याचा प्रकार घडला आहे.