अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- ज्यांना समाजात काहीच किंमत नाही तेच लोक माझ्यावर केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बिनबुडाचे आरोप करत असल्याची टीका आमदार संग्राम जगताप यांनी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर केली.
आ. जगताप म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै.पतंगराव कदम यांनी उद्योगमंत्री असताना नगर शहरातील एमआयडीसीमध्ये आयटी पार्कची उभारणी केली होती.
तेव्हा पासुन ते २०१९ पर्यत म्हणजेच २० वर्ष हे आयटी पार्क धूळखात पडले होते. एमआयडीसी विभागाने या आयटी पार्क मधील ऑफिसेस खाजगी व्यवसायिकांना विकले आहेत.
२०१६ पासून माझ्या मनात या ठिकाणी आयटी पार्क उभे रहावे, अशी संकल्पना होती व २०१९ मध्ये या ठिकाणी नगर शहरासह जिल्ह्यातील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा, या दृष्टिकोनातून पावले उचलले व स्टार्टअप कंपन्यांमधून सुरवात केली.
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या लॉकडाउन काळामध्ये देशात विविध उद्योगधंदे बंद पडले, तरुणांच्या हाताचा रोजगार गेला, विविध प्रकारचे रोजगाराची संकटे आज युवकांवर आहेत.
पुणे शहर आयटी हब म्हणून ओळखले जात आहे, या ठिकाणी सुद्धा अनेक युवकांना आपला रोजगार गमावावा लागला व वर्क फ्रॉम होम म्हणून काम करत आहे.
काहीचा उद्देश आयटी पार्क बंद पाडण्याचा आहे परंतु नगरची जनता सुज्ञ असून ही जनता काम करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे आहे. पूर्वी आरोप करून फक्त मते मिळवायचे दिवस आता राहिले नाहीत.