अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- विरोधकांवर टीकाटिपण्णी करून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. सध्या नागरिकांचे प्रश्न सोडवावेच लागतात.अशी टीका ऊर्जाराज्यमंत्री तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले की, यापूर्वी झाले ते झाले,मात्र यापुढे विकासकामांच्या दर्जाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही.
नगर- औरंगाबाद महामार्ग ते पिंपळगाव उज्जैनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अभियंत्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून, सुमारे सहा ते सात महिन्यांतच रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. नवीन वीज धोरणानुसार शेतकऱ्यांना ६० ते ७० टक्के वीजबिलात सवलत देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी योजनेचा फायदा घेऊन वीजबिल भरण्यास सहकार्य करावे. सद्यस्थितीत रोहित्र ओव्हरलोड असून, त्याबाबत नवीन रोहित्र देण्यासाठी परिसराचा आराखडा तयार करण्यात येणार आहे,
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळेल. कोणत्याही विकास कामांमध्ये ठेकेदारांनी मला भेटण्याची गरज नाही, फक्त कामाचा दर्जा चांगला ठेवावा, अशी सक्त ताकीद ना.तनपुरे यांनी दिली.