अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन व रेमडेसिवीर मिळावे अशी मागणी केली.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिवीर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिवीर देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार ३० एप्रिलपर्यंत राज्याला ४,३५,००० रेमडेसिवीर देणार आहे.
याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवदीप रिनवा यांनी २४ एप्रिल रोजी राज्य सरकारला पाठवले. त्यात म्हटले आहे की, यापूर्वी महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा जो साठा देण्याचा निर्णय घेतला होता त्याचा नव्याने आढावा घेतला आहे.
महाराष्ट्राला ४,३५,००० हजार रेमडेसिवीर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. गेले महिनाभर राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये रेमडेसिवीर मिळण्यावरून तीव्र असंतोष निर्माण झाला होता. जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिवीरसाठी रांगा लागायच्या.
रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून लोकांचा संताप वाढायला लागल्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेमडेसिवीरचे वाटप करण्याचे आदेश सरकारने काढले. जागोजागी साठेबाज शोधण्याच्या कामाला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी लागले.
अखेर लोकांच्या संतापाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या आणि रेमडेसिवीर मिळण्यावरून रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा वाढीव साठा मंजूर केला आहे.
यापूर्वी महाराष्ट्राला २,५९,२०० रेमडेसिवीर मंजूर केले होतो. देशातील सात प्रमुख रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या ११ लाख रेमडेसिवीरचा आढावा घेऊन यापूर्वी २१ एप्रिल ते ३० एप्रिलसाठीचे वाटप करण्यात आले होते.
मात्र नव्याने यात वाढ होऊन सर्व कंपन्यांकडून १६ लाख रेमडेसिवीर उपलब्ध झाल्यामुळे नव्याने सर्व राज्यांच्या रेमडेसिवीर मागणीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार सर्व राज्यांसाठी नव्याने रेमडेसिवीर पुरवठ्याचे फेरवाटप करण्यात आले.
त्यानुसार महाराष्ट्राला २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीसाठी ४,३५,००० रेमडेसिवीर देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असा विश्वास आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.