अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शेती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. परंतु शेतकरी यातून निराश हताश झालेला नाही. तो नवीन पिकासाठी सज्ज झाला.
पण, यासाठी लागणाऱ्या पीककर्जासाठी सध्या तो बँकेत जाऊ शकत नाही. यामुळे यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र तसेच जिल्हा अग्रणी बँक यांच्या माध्यमातून ऑनलाइन पिक कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक (सेंट्रल बँक ऑफ इंडिया ) चे बँक व्यवस्थापक संदीप वालावलकर यांनी दिली.
कृषी क्षेत्रामध्ये हे निश्चितच एक उल्लेखनीय पाऊल म्हणून ओळखले जाणार आहे. सध्या राज्यांमध्ये संचारबंदी असून शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सूट दिली असून, कमी कर्मचाऱ्यांवरतीच कार्यालय आणि बँकेचा कामकाजाचा बोजा आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या परिस्थितीचा परिणाम खरीप पिकावर होऊ नये यासाठी, बँकेने ऑनलाइन कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अहमदनगर जिल्ह्यामध्ये घेतला आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी https://ahmednagar.nic.in/notice/ahmednagar-district-application-for-crop-loan-2021-22/ या लिंकवर अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर बँकेच्या शाखेकडून अर्जदार शेतकऱ्यांना फोन करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नसल्याचे वालावलकर यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण काळामध्ये ऑनलाईन पीक कर्ज आणि निश्चितच एक चांगला पर्याय ठरू शकणार आहे, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.