अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- एकीकडे शेतकरी आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे वीज कंपनी कृषि पंपाचा वीज पुरवठा खंडित करत आहेत. यात शेतकरी पुरता वैतागला असतानाच शेतकऱ्यांसाठीच एक आनंदाची बातमी आहे.
ती म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे भाव परत एकदा वाढू लागले आहेत. तीन महिन्यानंतर आता पुन्हा कांदा पाच हजार रूपयांपर्यंत गेला आहे.
शनिवारी नगर बाजार समितीत झालेल्या कांदा लिलावात एक नंबर प्रतीच्या कांद्याला साडेचार ते पाच हजार रूपयांचा भाव मिळाला. शनिवारी लिलावासाठी एकूण २३८९२ क्विंटल कांद्याची आवक झाली.
सध्या गावरान कांदा बाजारात येत आहे. पाच महिन्यांपूर्वी हाच गावरान कांदा दहा हजारांपर्यंत पोहोचला होता. यावेळी लाल कांद्याचीही मोठी आवक बाजारात होत होती.
सध्या लाल कांद्याची आवक बंद होऊन आता गावरान कांद्याची आवक होत आहे. मध्यंतरी १ लाख कांदा गोण्यांपर्यंत गेलेली आवक भाव पडल्याने कमी होत गेली.
सध्याही केवळ ४० ते ४५ हजार गोण्यांची आवक होत आहे. याशिवाय इतर राज्यांत कांदा उत्पादन कमी असल्याने महाराष्ट्रातील कांदा बाहेर जाऊ लागला आहे.
परिणामी पडलेल्या भावाने पुन्हा उचल खाल्ली असून कांदा तीन महिन्यानंतर पुन्हा पाच हजारांपर्यंत गेला आहे. जर आवक आणखी कमी झाली तर आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.