अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात ‘वन नेशन, वन रेशन’ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परराज्यातील कार्डधारकांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे धान्य देण्यात येणार आहे.
तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. परराज्यातील नागरिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे.
तसेच जिल्ह्यातील लोक मोठ्याप्रमाणात आपले गाव सोडून इतर तालुका, जिल्ह्यात कामाला जात असतात. त्यांना त्याठिकाणी धान्य घेता येणार आहे.
तसेच जिल्ह्यातील लोकांनाही आता गाव, तालुका, जिल्ह्यातील कोणत्याही रेशन धान्य दुकानातून आपले धान्य खरेदी करता येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.
मात्र, संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार किती धान्य देय आहे. तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे.
एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे.
कार्डवर नावे असलेल्या उर्वरित सदस्यांना त्यांचे धान्य त्यांच्या राज्यात घेता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी होणार आहे.