Indian Railways : भारतीय रेल्वे प्रशासन सतत प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा सुरु करत असते, परंतु काही प्रवाशांना याबद्दल कोणतीही माहिती नसते त्यामुळे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही. रेल्वे प्रशासनाने आता महिलांसाठी खास सुविधा सुरु केली आहे.
रेल्वेकडून महिलांसाठी बर्थ आरक्षित निश्चित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. महिलांना कोणत्याही परिस्थितीत ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रेल्वेच्या या निर्णयाचा फायदा महिलांना होणार आहे.
महिला प्रवाशांसाठी केले विशेष बर्थ आरक्षित
भारतीय रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये महिला प्रवाशांसाठी विशेष बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर रेल्वेकडून महिलांच्या सुरक्षेसाठीही विशेष योजना आखण्यात आल्या आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिलांच्या आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वेकडून राखीव बर्थ निश्चित करण्यासह वेगवेगळ्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
स्लीपर क्लासमध्ये असणार राखीव बर्थ
लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ आरक्षित केले जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. गरीब रथ, राजधानी, दुरांतोसह वातानुकूलित गाड्यांच्या थर्ड एसी कोचमध्ये (3AC क्लास) महिला प्रवाशांसाठी सहा बर्थ राखीव असणार आहे. प्रत्येक स्लीपर क्लासमध्ये सहा ते सात लोअर बर्थ असतील तसेच वातानुकूलित 3 टियर (3AC) मध्ये चार ते पाच लोअर बर्थ असणार आहेत.
वातानुकूलित 2 टियर (2 AC) डब्यातील तीन ते चार लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षे व त्यावरील महिला प्रवासी आणि गर्भवती महिलांसाठी राखीव ठेवले आहेत.