अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिलेला पावसाचा अंदाज देखील फोल ठरल्याने सोमवारपासून सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्रातील पावसावर शेतातील उभ्या पिकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, मुळा धरणाचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत असताना पुनर्वसू नक्षत्रातील ठरावीक पावसाचा अपवाद वगळता चारही नक्षत्रातील दिवस कोरडे गेले.
पुर्नवसू नक्षत्रात झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असले, तरी गेल्या पंधरवाड्यातील पुष्य नक्षत्र कोरडे गेल्याने शेतातील खरीप तसेच उसाच्या पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली. घाटमाथ्यावर पाऊस मंदावल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली.
सोमवारी सायंकाळी ६ वाजता कोतूळकडुन मुळा धरणात २६३५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सोमवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा १६ हजार २ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ६१.५० टक्के भरले. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची ११ हजार ९१५ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती.
सोमवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाची पाणीपातळी १७९१.८५ फूटापर्यंत पोहोचली. मागील वर्षी आजच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील पाणी पातळीची १७८१ नोंद झाली होती. घाटमाथ्यावर पाऊस मंदावल्याने सोमवारी कोतूळकडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे.