Pune News : आपल्यापैकी अनेकांचे घराचे स्वप्न असते. आपलेही हक्काचे घर असावे अशी अनेकांची इच्छा असते. मात्र वाढती महागाई, इंधनाचे वाढलेले दर, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढती मजुरी या सर्व पार्श्वभूमीवर घर खरेदी करणे अवघड बाब बनली आहे.
घरांच्या किमती ह्या खूप वाढल्या आहेत. अशातच जर पिंपरीसारख्या भागात घर घेण्याचे ठरवले तर खिशात लाखो रुपयांचा खळखळाट लागतो. यामुळे ज्या लोकांचे कमी उत्पन्न आहे त्यांना पिंपरी चिंचवड सारख्या शहरांमध्ये घर खरेदी करणे म्हणजे जणू स्वप्नाच्या पलीकडची गोष्ट बनली आहे.
मात्र जर तुमचे तीन लाखांपेक्षा कमीचे उत्पन्न असेल तर तुम्हाला फक्त आठ लाखात घर मिळणार आहे. हो बरोबर ऐकताय तुम्ही पिंपरी-चिंचवड मध्ये आता मात्र आठ लाखात कमी उत्पन्न असलेल्या लोकांना घर उपलब्ध होणार आहे. खरंतर गेल्या सहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने पंतप्रधान आवास योजना राज्यातील 51 शहरात राबवण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी गृहनिर्माण विभागाकडून केली जात आहे. यात पिंपरी चिंचवड महापालिकेचा देखील समावेश आहे. यानुसार राज्य शासनाने 2017 मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात म्हणजेच 2022 पर्यंत घरे बांधण्याचे लक्षाॅंक दिले होते. यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात 10 ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे उभारण्याचे निश्चित केले.
मात्र पिंपरी आणि आकुर्डीमध्ये राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेला मुहूर्त सापडत नव्हता. परंतु आता पिंपरी आणि आकुर्डी मधील 938 घरे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. आकुर्डीत 568 आणि पिंपरीत 370 घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक पिंपरी चिंचवड शहरात घरांच्या किमती या 40 ते 50 लाखांपर्यंत आहेत.
पण या योजनेच्या माध्यमातून आता सर्वसामान्यांना केवळ आठ लाखात घर मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे, काय प्रक्रिया राहणार आहे, अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी राहणार प्रक्रिया
यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक लोकांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने 28 जून पासून अर्ज सादर करता येणार आहेत. विशेष बाब अशी की ही अर्ज प्रक्रिया तब्बल एक महिना सुरू राहणार आहे.
28 जुलै पर्यंत इच्छुक लोकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करताना इच्छुक लोकांना दहा हजार रुपये अनामत रक्कम आणि पाचशे रुपये नोंदणी शुल्क असे दहा हजार पाचशे रुपये ऑनलाईन भरावे लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्या लोकांची यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे.
यादी जाहीर झाली की पंधरा दिवसाच्या आत विजेत्यांना लाभार्थी हिश्याची 10% रक्कम भरावी लागणार आहे. तसेच उर्वरित 90% रक्कम ही विजेत्याला एका महिन्याच्या आत भरावी लागणार आहे. घर घेतलेल्या लोकांना मात्र दहा वर्षे हे घर विकता येणार नाही तसेच भाड्याने देता येणार नाही.
लाभार्थी, केंद्र व राज्य सरकारचे अनुदान किती?
आकुर्डी मध्ये 568 घरे राहणार आहेत. यासाठी सात लाख 35 हजार 255 रुपये लाभार्थ्याला भरावे लागणार आहेत. तसेच केंद्र शासनाकडून दीड लाखाचे आणि राज्य शासनाकडून एक लाखाचे अनुदान मिळणार आहे.
म्हणजेच घराची एकूण किंमत 985,255 एवढी राहणार आहे. पिंपरीमध्ये 370 घरे राहणार आहेत. यासाठी सात लाख 92 हजार 699 एवढा लाभार्थी हिस्सा राहणार आहे.
तसेच केंद्र शासनाकडून दीड लाखाचे आणि राज्य शासनाकडून एक लाखाचे अनुदान राहील म्हणजे घराची एकूण किंमत दहा लाख 42 हजार 699 एवढी राहणार आहे.
महापालिकाही करणार खर्च
या घरांसाठी बांधकामाचा खर्च लाभार्थी, केंद्र आणि राज्य शासनाकडून केला जाणार आहे. तसेच प्रकल्पासाठी येणारा मूलभूत सुविधांचा खर्च, जागेची किंमत, आकस्मिक व आस्थापना शुल्क यासाठी महापालिका खर्च करणार आहे.