ताज्या बातम्या

खुश खबर: वीज कर्मचाऱ्यांना देखील मिळणार बोनस! कोणाला किती रुपये मिळणार वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना बोनस देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

“वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी,कर्मचारी यांना १२ हजार तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल,” अशी घोषणा डॉ. राऊत यांनी या बैठकीच्या समारोप प्रसंगी केली.

सुरुवातीला वर्ग १ व २ च्या अधिकारी यांना वगळून १० हजार सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला.

मात्र कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर व त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली.

वीज बिलाची प्रचंड थकबाकी, शासनाकडून पाणीपुरवठा, पथदिवे यांच्याकडून न मिळालेले अर्थसहाय्य तसेच कोळसा कंपनीची थकबाकी,

वीज निर्मिती करणाऱ्या शासकीय व खासगी कंपन्यांची प्रलंबित देयके, कृषीपपांची नगण्य वीज वसुली या कारणांमुळे सध्या तिन्ही कंपन्या अत्यंत बिकट अशा आर्थिक संकटातून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे, असे राऊत यांनी यावेळेस सांगितले.

Ahmednagarlive24 Office