अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-भारतात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाचा सध्याच्या स्थितीला सर्वाधिक प्रादुर्भाव हा भारतात होताना दिसून येत आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यातच देशवासियांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.
रशियन लस स्पुतनिक-V ची पहिली खेप शनिवारी हैदराबादेत दाखल झाली. ही लस कोरोना व्हायरस विरोधत 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे बोलले जाते.
लसीकरण कार्यक्रमाची गती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच स्पुतनिक -V ला इमेरजन्सी वापराची परवानगी दिली होती. भारतात रशियाचे राजदूत म्हणाले, स्पुतनिक-V चा प्रभाव जगातील अनेक लशींपेक्षा अधिक आहे.
तसेच ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी आहे. याचे लोकल प्रोडक्शनही लवकरच सुरू होईल. ते नियोजनबद्ध पद्धतीने वाढवून दरवर्षी 850 मिलियन (85 कोटी) डोसपर्यंत नेले जाईल.
भारतात 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यावरील लसीकरणासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन नोंदणी केली आहे.
मात्र, अनेक ठिकाणी लशींच्या कमतरतेमुळे लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आज सुरुवात होऊ शकली नाही. मात्र, आता रशियन लस आल्याने लसीकरण कार्यक्रमाला गती मिळण्याची आशा आहे.