अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- पुढील आठ दिवसांत मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशनपर्यंत अमृत पाणी योजनेचे पाणी येणार आहे. मुळा धरण ते नगर शहर, असे ३४ किलोमीटरपर्यंतचे अमृत पाणी योजनेचे काम सुरू आहे.
आता या कामातील सर्व अडचणी दूर होऊन काम मार्गी लागले आहे. पुढील काही दिवसांत विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडीपर्यंतच्या पाईपलाईनचे कामही पूर्ण होणार आहे. यामुळे नगर शहराला आता पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
महापालिकेतर्फे अमृतच्या अंतिम टप्प्यातील जोडणीचे काम हाती घेतले आहे. त्या कामाची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांनी केली.
दरम्यान नगर शहरातील वसंत टेकडी येथे अमृत योजनेमधून ५० लाख लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे काम पूर्ण झाले आहे. याद्वारे नगर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. येथील जुनी ६७ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाणार आहे.
पाण्याची गळती बंद होऊन पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून नगर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होत होता.
यामुळे नागरिकानं पाणी टंचाईच्या संकटास तोंड द्यावे लागत होते. मात्र आता अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण शहराला फेज टू पाणी योजनेद्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
नगर शहराचा पुढील चाळीस वर्षांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. आज नगर शहराला ७३ दशलक्ष लिटर पाणी मिळते.
हे काम पूर्ण झाल्यानंतर ११७ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. म्हणजेच ४० दशलक्ष लिटर पाणी जास्त वापरास नगरकरांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे व महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली