सरकारी वाहनचालकास बेदम मारहाण करून लुटले! ‘या’ महामार्गावरील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- नगर महामार्गावरील पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे गजानन पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेला वाहन चालक अरुण गौतम भोले यास दि . ८ रोजी पहाट ४ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना म्हसणे शिवारात घडली .

याबाबत सविस्तर असे की, सरकारी वाहन (क्र एमएच ०३ डीए ७०८१ ) चा चालक अरुण गौतम भोले (हल्ली रा .वाशी नाका, चेंबूर मुंबई. मूळ रा. खांडवी ता.गेवराई जि.बीड ) हा रविवारी रात्री मुंबईकडे जात असताना उशीर झाल्याने म्हसणे फाटा येथील पंपावर गाडी लावून रात्री १२.३० च्या सुमारास गाडीत झोपला.

सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी त्यास बेदम मारहाण करून जखमी केले व त्याच्याकडील १ लाख २० हजार रुपये किमतीची ४ तोळे सोन्याची चैन ‘ व्हीवो कंपनीचा २ हजार रुपये किमतीचा मोबाईल व ७ हजार २०० रुपये रोख असा एकूण एक लाख २९ हजाराचा ऐवज लांबवला.

भोले यांना लुटल्यानंतर सुपा परीसरातील दौलत पेट्रोल पंपाजवळ त्याच चोरट्यांनी संजय ठकाजी नानोर (रा. डिग्रस ता.राहुरी) या वाहन चालकास अडवून त्याच्या जवळील रोख रक्कम काढून घेऊन पलायन केले.

अरुण भोले (वय – ३०, ड्रायव्हर) याच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटना स्थळाल पोनि. नीतीनकुमार गोकावे यांनी भेट देऊन माहिती घेतली. घटनेचा पुढील तपास उप निरीक्षक चंद्रकांत कोसे करीत आहेत .

अहमदनगर लाईव्ह 24