ताज्या बातम्या

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ! अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल.

यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रितीने एकत्रितरीत्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

दरम्यान, सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी व प्रशासनाला पंचनामे युद्धपातळीवर करण्याबाबत पुढाकार घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

राज्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपीटसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने सादरीकरण केले.

पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी,

असे औपचारिक निर्देश महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन) विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना मंगळवारीच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याच्या एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी बांधावर जाऊन स्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील यासंदर्भात प्रशासनाने युद्धस्तरावर काम करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office