दशक्रिया विधीसाठी ग्रामपंचायतीने लावला ‘मुंडन कर’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोना काळात कर्जत तालुक्यातील तीर्थक्षेत्र सिद्धटेक येथे दशक्रिया विधीच्या नावाखाली नागरिकांची मोठी लूट होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दशक्रिया विधींना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील सिद्धटेक येथे दशक्रिया विधी सुरू ठेवण्यात आले आहेत.

रोज साधारण २० ते २५ दशक्रियाविधी भीमेच्या घाटावर होतात. या दशक्रिया विधीसाठी ग्रामपंचायतीने मुंडन कर लावला आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कर वसुलीसाठी ग्रामपंचायत दरवर्षी लिलाव घेते.

या वर्षी लिलावाची तारीख संपून गेली आहे. त्यामुळे दशक्रिया विधी केल्यानंतर मुंडन लिलाव कर आकारणी होते, परंतु ती ग्रामपंचायतीला जमा न करता काही जणांच्या खिशात जात आहे.

ग्रामपंचायतीने निर्धारित केलेल्या करापेक्षा अधिक पैसे नागरिकांकडून घेतले जातात. या प्रकाराला तात्काळ आळा घालावा व अफरातफरीची तातडीने चौकशी करावी.

अशी मागणी होत आहे. पौराहित्य व इतर साहित्याचा खर्च अव्वाच्या सव्वा वसूल केला जात आहे. नाईलाजाने नागरिक पैसे भरत असल्याचे दिसून येते.

पैसे दिल्यावर नाममात्र पावती देण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान सिद्धटेक याठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी अनेकजण येत असल्याने याचा गैरफायदा ग्रामपंचायतीमधील काहीजण घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24