अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-सध्या राज्यात महावितरणकडून थकीत वीजबिल वसुली चालू आहे. थकबाकीदार ग्राहकांवर आक्रमक कारवाई करत वीजपुरवठा खंडित केला जातो आहे.
आता याच महावितरणावरील थकबाकी प्रकरणी ग्रामपंचायत कारवाई करणार आहे. हा प्रकार जेऊरमध्ये घडला आहे. जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे ग्रामपंचायतची पाणीपट्टी व कर मिळवून सुमारे १ लाख ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे.
ही थकबाकी सुमारे सहा वर्षापासून असल्याकारणाने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये मार्च अखेरीस थकबाकी जमा न झाल्यास जेऊर येथील महावितरण कंपनीचे कार्यालय सील करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.
मागील आठवड्यात महावितरण कंपनीने ग्रामपंचायतकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकीसाठी ग्रामपंचायतचे वीज जोड तोडले होते.
विजजोड तोडण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्यही आक्रमक होत महावितरण कंपनीला थकबाकी भरण्याबाबत नोटीस काढली आहे. नोटीसमध्ये थकबाकी जमा न केल्यास कार्यालय सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.