दुचाकी-कार अपघातात आजोबा-नातवाचा मृत्यू तर आजी गंभीर जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  कारची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात आजोबा व नातू ठार झाले, तर आजी गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास शेवगाव नेवासे राज्यमार्गावर दत्तपाटी येथे घडली.

या अपघातात दुर्योधन भालचंद्र आरगडे (वय ५३), प्रथमेश प्रमोद आरगडे (वय ६, दोघेही रा. सौंदाळा, ता. नेवासा), असे निधन झालेल्या आजोबा, नातवाचे नाव आहे. मीनाबाई दुर्योधन आरगडे (वय ४८) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सौंदाळा येथील दुर्योधन आरगडे हे पत्नी मीनाबाई, नातू प्रथमेश यांच्यासह मुलीला भेटण्यासाठी शेवगाव तालुक्यातील वरूर येथे आले होते. मुलीची भेट घेऊन शुक्रवारी (दि.२३) ते वरूर येथून सौंदाळा येथे चालले होते.

सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शेवगाव- नेवासा राज्यमार्गावर दत्तपाटीनजीक त्यांच्या दुचाकीला नेवासामार्गे येणाऱ्या कारने समोरून जोराची धडक दिली. या अपघातात आजोबांसह नातवाचा मृत्यू झाला त्याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अपघातात मीनाबाई आरगडे याही गंभीर जखमी असून, त्यांच्यावर विळद घाटातील रुणालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24