ताज्या बातम्या

Group Farming : सामूहिक शेती ठरली शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; बीडच्या शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून कमवले एकरी 3 लाख रुपये

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Collective farming :  गाव करील ते राव काय करील? याप्रमाणे बीड जिल्ह्यातील (Beed District) मौजे कुमशी येथील शेतकऱ्यांनी कार्य करीत गट शेतीच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे.

मौजे कुमशी येथील 14 शेतकऱ्यांनी एकजुटीचे सामर्थ्य दाखवत सामूहिक शेती (Collective farming) करून दाखवली आहे. यामुळे सामूहिक शेतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

कुमशीच्या 14 शेतकऱ्यांनी गट शेतीच्या (Group Farming) माध्यमातून टरबूज लागवड करीत एकरी तीन लाखांचे उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे.

यामुळे पंचक्रोशीत मौजे कुमशीचे नाव गाजत असून या शेतकऱ्यांची यशोगाथा (Farmer Success Story) इतर शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी प्रेरणादायी ठरत आहे.

या 14 शेतकऱ्यांनी शेतीत काहीतरी हटके करायचे असे ठरवले यासाठी त्यांनी आपापसात मिळून एक गट तयार केला आणि पुढे चालून गट शेतीचा स्वीकार करत आपल्या 25 एकर क्षेत्रावर टरबुज पिकाची लागवड केली.

या गट शेतीचा या शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून त्यांना टरबूज चे एकरी 30 टन उत्पादन मिळत आहे. सध्या टरबुजाला 12 रुपये प्रति किलोपर्यंतचा दर आहे अर्थात या शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन मिळत आहे.

या शेतकऱ्यांना टरबूज लागवडीसाठी एकरी 50 ते 60 हजारांचा खर्च आला आहे म्हणजेच एकरी 3 लाख रुपये निव्वळ नफा या शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

मौजे कुमशी येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरून शेती करण्यासाठी एकत्र येऊन सामूहिक शेतीचा सहारा घेतला आहे.

गटशेतीचा स्वीकार केल्यामुळे या शेतकऱ्यांचा मजुरीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचला असल्याचे सांगितले जातं आहे. टरबूज या वेलीवर्गीय हंगामी फळ पिकाबरोबरच आता गटातील शेतकरी फळबाग शेतीकडे वळणार असल्याचे सांगितले जात आहे.

सामूहिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते, गट शेती केल्यापासून शेतमालाच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम झाला असून शेत पिकाचा दर्जा हा उंचावला आहे.

शेत मालाचा दर्जा सुधारला असल्याने आता व्यापारी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतमालाची खरेदी करीत आहेत. शेती क्षेत्रात येत असलेल्या अनेक समस्या दूर करण्यासाठी या शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग स्वीकारला असून सध्याच्या घडीला हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होत आहे. निश्चितच गाव करील ते राव काय करील? हे या शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

Ahmednagarlive24 Office