अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता ज्यांना गरज आहे, त्यांनाच इंजेक्शन द्यावे, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट दिली यावेळी ते बोलत होते.
यावेळी ना. मुश्रीफ यांनी तालुक्यातील सर्व यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटर व सर्व रूग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची उपलब्धता ठेवण्याच्या
दृष्टीने यंत्रणांद्वारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करून घाटीतील गंभीर रूग्णांचा मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले.
ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा सुरळीत तसेच रेमडेसीविरची पूरेशी उपलब्धता, करून देण्यासाठी पाठपुरवा सुरू असून लवकरच ते उपलब्ध होतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
आमदार काळे म्हणाले, ५०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. परंतु ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांची टंचाई जाणवत आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा,
व कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका मिळावी, अशी मागणी आमदार काळे यांनी केली. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्हेंटीलेटर बेडची संख्या वाढविणे, रेमडेसीवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा,
ॲँटीजन चाचणीची वेळ वाढवावी, चाचणी कमी दरामध्ये उपलब्ध करुन द्यावी, मतदारसंघासाठी कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध करुन द्यावी, गाव तेथे विलगीकरण कक्ष या विविध मागण्यांचे निवेदन ना. मुश्रीफ यांना दिले.