अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राज्यासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. मात्र, जिल्ह्याचा रुग्ण बाधितांचे प्रमाण आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता या निकषांच्या बाबतीत आपला जिल्हा स्तर एक मध्ये आहे.
त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरु होणार आहेत. मात्र, धोका संपलेला नाही. दुसऱ्या लाटेत कोरोनाची भीषणता आपण अनुभवलेली आहे.
त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे, अन्यथा परत एकदा कठोर निर्णय घ्यावे लागतील. असे मत पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
ते शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होत आहेत.
मात्र याचा अर्थ असा होत नाही की, जिल्ह्यातून कोरोना गेला आहे. त्यामुळे एकाच वेळी जास्त गर्दी करू नका.शासनाच्या नियमांचे पालन करा.
जेणेकरून आपण संभाव्य तिसरी लाट वेळेत रोखण्याचे प्रयत्न करू. आगामी सात दिवसांच्या कालावधीत जर जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी राहील्यास सर्व व्यवहार असेच
सुरू राहतील मात्र जर दुर्दैवाने या कालावधीत जर रूग्णसंख्या वाढली तर मात्र परत एकदा निर्बंध घालावे लागतील असेही ते म्हणाले.