अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण, अतिदुर्गम भागातील मुलांचे शिक्षणाचे आजही मोठे आव्हान आहे.
कोरोना महामारीचा सामना करताना सर्व नियमांचे पालन करून दुर्गम भागातील विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाऊ नयेत, म्हणून पालकांची भेट घेऊन गुरुजींनी वाड्या – वस्त्यांवर अध्ययन सुरू केले आहे.
संगमनेर तालुक्यातील बोटा येथील नाथाबाबा विद्यालयाचे शिक्षक बोटा परिसरातील दुर्गम भागातील आदिवासी वाड्या – वस्त्यांवर जाऊन येथील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
नाथाबाबा विद्यालयातील शिक्षकांनी याबाबत नवनवे प्रयोग राबवत मार्ग काढला आहे. २१ जूनपासून ५वी ते १२वीचे वर्ग सुरू केले असून, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी वाडी, वस्त्यांवर जात शाळा भरविण्यास सुरुवात केली आहे.
यात ४० ते ४५ टक्के मुले ऑनलाईन अध्ययनात सहभागी होतात. मात्र, जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी शिक्षकांनी वैयक्तिक बक्षिसांची योजना आखली आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थांना दररोज अभ्यास दिला जात असून, तो पालकांच्या मदतीने सोडविण्यास सांगितले जात आहे.