साखर कारखाना कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगारासाठी सुरू केलेल्या उपोषण आज तिसऱ्या दिवशी सुरूच होते.

कारखाना व्यवस्थापन आंदोलकाकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांनी अर्धनग्न आंदोलन करून डॉ.सुजय विखे व संचालक मंडळाचा निषेध नोंदविला.तर संचालक मंडळाच्या दावणीला बांधलेल्या युनियनने कामगारांचे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला.

झालेला खर्च देण्याचे आमिष दाखविले, उपोषणकर्त्या कामगारांनी धुडकावून लावत थकीत देणी घेतल्या शिवाय आंदोलन थांबाणार नसल्याचे कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी सांगितले. बुधवारी कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होते.

मात्र दुपारपर्यंत पत्रकार परिषद झाली नाही. सोमवारपासून तनपुरे कारखान्याचे ७ कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे थकीत पगार मिळावेत यासाठी उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप कारखाना व्यवस्थापनाने कुठलीही भूमिका घेतली नाही.

कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार होते. दुपारी २ वाजेपर्यंत पत्रकार परिषद पार पडली नव्हती. बुधवारी सकाळी कामगारांनी उपोषण मंडपात अर्धनग्न होऊन कारखाना व्यवस्थापनाचा निषेध केला.

संचालक मंडळाच्या दावणीला बांधलेल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरु झाल्या पासुन झालेला सर्व खर्च संचालक मंडळ देण्यास तयार असल्याचा निरोप देवून आंदोलन हाणून पाडण्याचा या ना त्या मार्गे प्रयत्न करीत आहे.परंतू उपोषण करण्यापुर्वी कामगारांनी शनि देवते समोर शपथ घेऊनच आंदोलन सुरु केले आहे.

युनियनचे अमिष धुडकावून लावत कामगारांची देणी कधी देणार हे सांगा.नाहीतर आमचे आंदोलन सुरुच राहणार देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अण्णासाहेब मासाळ, आरोग्य सहायक अनिल मुळे,समुदाय अधिकारी रेखा पंडित, शरद मोरे, जुलेखा शेख आदींनी उपोषण कर्ते कामगारांची आरोग्य तपासणी केली.

आंदोलनस्थळी राहुरी पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनात कारखान्याचे दोनशे पेक्षा जास्त कामगार सहभागी झाले आहेत.

उपोषणा दरम्यान विविध आंदोलने सुरु झाल्याने संचालक मंडळाच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने संचालक मंडळाने युनियनला हाथाशी धरुन आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न चालवले आहे असा आरोप पेरणे यांनी केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24