अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- साकत ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळवाडी येथे गेल्या २० वर्षांपासून होत असलेला अनियमित पाणीपुरवठा त्वरित नियमित करावा. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात हंडामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पिंपळवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
तसे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले. तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी व पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीस वर्षांपासून गावाला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून पाठपुरावा केला जात आहे.
मात्र प्रशासन गांभीर्याने घेत नाही. पाईपलाईन लिकेज आहे. विहीरीत पाणी नाही. पाणी पुरवठा कर्मचारी पाणी सोडत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. गावात दोन ग्रामपंचायत च्या विहिरी व १ कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करून मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम करण्यात आले आहे.
असे असले तरी विहिरीवरून पाणी शेंदून आणावे लागत आहे. यामुळे काही महिलांचा तोल जाऊन अनेक अपघात झाले आहेत. तर दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात येईल,
असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर लक्ष्मण घोलप, विशाल नेमाने, योगेश नेमाने, अजय नेमाने, अक्षय मोहिते, विजय घोलप, ऋषिकेश सतिष घोलप, शिवनाथ घोलप यांच्या सह २० ते २५ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.