अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-३० एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा अंदाज टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवला आहे.
मात्र, ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असेही या तज्ज्ञांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरु राहिले पाहिजे.
पहिले सहा तास वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण व्हावे. त्यानंतर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल, असेही ‘टास्क फोर्स’च्या डॉक्टरांनी सांगितले.
कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल 15 दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 हजारांच्या खाली आहे.
पुणे शहरातही हा बदल बघायला मिळाला आहे. एकटच्या पुणे शहरात सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं बघायला मिळालं आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.