अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- ग्रामपंचायत स्तरावर हायमास्ट पथदिव्यांमुळे प्रचंड वीजबिले येत आहे. थकीत वीज बिलांची रक्कम दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाने अखेर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
यापुढील काळात ग्रामपंचायत हद्दीत हायमास्ट दिवेच बसवायचे नाही असा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतील हद्दीतील रस्त्यांवरील पथदिव्यांच्या विद्युत देयकांवरील खर्च भागविण्यासाठी शंभर टक्के अनुदान राज्य शासन देते.
या विद्युत देयकांवरील खर्चात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे. दुसरीकडे महावितरण कंपनीकडून देय़कांच्या भरणा करण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला जातो.
बहुतांश ग्रामपंचायती आपल्या हद्दीत अनेक ठिकाणी हायमास्ट दिवे बसवितात, ज्याचे वीजेचे बिल अधिक येते. देयकांमध्ये अधिकच वाढ होऊ लागल्याने हायमास्ट दिवे बसविण्यावरच निर्बंध आणण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधिन होती, त्या नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना विविध योजनांतून अनुदान मंजूर करुन वितरण करणार्या कार्यालयांनी या अनुदानातून हायमास्ट बसविण्यास मान्यता देऊ नये असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसरीकडे रस्त्यांवरील दिव्यांच्या वीज वापरात बचत करण्यासाठी दिवे एलईडीचे वारावेत व पथदिवे सौरउर्जेवर चालविण्याचाही प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.