अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- तब्बल दहा वर्षापासून ग्रामीण भागात घरफोडी करणारा तसेच महिलांचे दागिने लंपास करणारा सराईत चोरटा बस स्थानकावर टेहळणी करण्यासाठी आला खरा मात्र, यावेळी त्याची थेट तुरुंगात रवानगी झाली आहे.
अजिनाथ विलास भोसले असे त्या अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, टेहळणी करून घरफोडी करणारा तसेच
महिलांचे दागिने लंपास करणारा सराईत चोरटा नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील बस स्थानकावर चोरीच्या उद्देशाने टेहळणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कटके यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी पोसई गणेश इंगळे,दत्तात्रय हिंगडे,बबन मखरे,संदीप घोडके,सुनील चव्हाण,संदीप पवार, शंकर चौधरी,जालिंदर माने आदीच्या पथकाने या ठिकाणी सापळा लावला.
दरम्यान काही वेळात एकजण होंडा युनिकॉर्ण या मोटारसायकलवरून संशयादस्पदरित्या फिरताना दिसला.पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले,त्याचे नाव विचारले असता अजिनाथ विलास भोसले असे सांगितले.
त्याचाकडून सोन्याचे दागिने व मोटारसायकल असा एकूण १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून अनेक ठिकाणी चोरी केल्याच्या घटनाची माहिती मिळू शकते.