अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी नगरचे पालमंत्री हसन मुश्रीफ काल पाथर्डी-शेवगावमध्ये येणार होते. त्यामुळे सरकारकडुन काहीतरी पदरात पडेल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.
पण अचानक मुश्रीफांचा दौरा रद्द झाला आणि बळीराजाच्या नशीबाने पुन्हा माती खाल्ली. नुकसान पाहुन गेले .पंचनामे झाले पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काय व कधी पडणार. शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणणारे हे सरकार शेतकरीविरोधी आहे.
असा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकट्या पाथर्डी तालुक्यातील तब्बल ८९ गावातील २६ हजार ६०० शेतकऱ्यांच्या१५ हजार २०० हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
महसुल व कृषी विभागाच्या स्थनिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारकडे अहवाल पाठविला आहे. मात्र सरकारने अद्याप शेतकऱ्यांना कसलीही मदतीची घोषणा केली नाही. तालुक्यात ३० आँगस्ट २०२१ च्या रात्री अतिवृष्टी झाली.
२६५ मिलीमिटर पाऊस अवघ्या दोन -तिन तासात बरसला. ढगफुटीचा प्रकार घडल्याने पुर आला आणि शेतीची पिके, जनावरे, शेळ्या ,कोंबड्या वाहुन गेल्या. पशुधन गेले व पिके गेली. सर्व पुढाऱ्यांनी पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
आश्वासने सर्वांनीच दिले मात्र आज जवळपास वीस दिवसानंतरदेखील शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी पाथर्डी-शेवगावच्या दौ-यावर येणार होते मात्र त्यांनीही ऐनवेळी दौरा रद्द केला.
त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा चालविली आहे. असा आरोप आम आदमी पक्षाचे आव्हाड यांनी निवेदनाव्दारे केला आहे.