अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- महामार्गावरून एक अवजड ट्रक मालाची डिलेव्हरी घेऊन जात असताना अचानक एका वळणावर पलटी झाला. मात्र यावेळी या ट्रक खाली येतायेता एक दुचाकीस्वार बालंबाल बचावला आहे. काळ आला होता पण वेळ नाही, असेच म्हणावे लागले.
त्या व्यक्तीने प्रसंगावधान दाखवले नसते तर तो क्षणातच प्राणाला मुकला असता. याबाबत अधिक माहिती अशी कि, तळेगाव दिघेमार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने पावडर मटेरियल गोण्या भरलेला मालट्रक ( एमएच ४५, एएफ ९५७७ ) नाशिकच्या दिशेने जात होता.
दरम्यान, मालट्रक तळेगाव दिघे बाजारतळानजीक आला असता अरुंद रस्ता असल्याने अपघाती वळण पुलावर ट्रक उलटला. त्याचवेळी समोरून दुचाकीवरून किरण रामनाथ दिघे हा युवक गावात येत होता. मात्र मालट्रक अंगावर येत असल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकीवरून उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला.
दरम्यान, दुचाकी मालट्रकखाली दबली. ओढ्यावरील अरुंद पुलावर अपघात झाल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश दिघे, युवक कार्यकर्ते अमोल दिघे, गणेश गोर्डे, संपतराव दिघे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.