अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर शहरातील माळीवाडा वेस येथील शनि मंदिरामध्ये चोरट्यांनी चोरी करत दानपेटी, चांदीची कपाळ पट्टी व डोळे, काळ भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी मातेचे डोळे असा मुद्देमाल चोरून नेला होता.
या प्रकरणी मंदिराचे पुजारी अनंत अनिल पांडे यांनी फिर्याद दिली होती व कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. चोरट्याने जाळीवरून उडी मारून मंदिरातील आतील दरवाजाचे कडीकोयंडा तोडला.
व शनि मंदिरातील दानपेटी, चांदीची कपाळ पट्टी, डोळे तसेच भैरवनाथ महाराज, जोगेश्वरी मातेचे डोळे चोरून नेले होते. या मंदिराचे पुजारी दुसऱ्या दिवशी पहाटे पुजा करण्यासाठी आले. त्यावेळेस चोरी झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान अहमदनगर रेल्वेस्थानक परिसरात देवाचे दागिने विकण्यासाठी तरुण आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विवेक पवार यांच्या पथकाने सावंत यास ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता, दागिने आढळून आले. त्यास विश्वासात घेतले असता, त्याने माळीवाड्यातील मंदिरातून हे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे.
शहरातील माळीवाड्यातील शनिमंदिरात चोरी करणारा आरोपी रामदास विष्णू सावंत (वय २१, रा. जांबूत, ता. संगमनेर ) याला कोतवाली पोलिसांनी रविवारी (ता. १८) गजाआड केले आहे.