Maharashtra news : काल दुपारी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे दोन महिलांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती, या घटनेमध्ये मंजुळा दिपक ढवळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. महिलेची आई तुळजाबाई रंगनाथ झांबरे हि गंभीर जखमी झाली आहे
महिलांवर गोळीबार करणारा निवृत्त सैनिक, पिस्तुल जप्त महिलेची आई तुळजाबाई रंगनाथ झांबरे हि गंभीर जखमी झाली आहे. शिरुर पोलिस स्टेशन येथे दिपक पांडुरंग ढवळे व संदीप पांडुरंग ढवळे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंजुळा दिपक ढवळे (वय ३५ वर्षे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर) या दिपकच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर दिपकची सासू मंजुळाची आई तुळजाबाई रंगनाथ झांबरे (वय ५५ वर्षे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर) हि गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दीपक व मंजुळा यांना वैष्णवी (वय १२) व तन्वी (वय ८) या दोन मुली असून, मंजुळा या न्यायालयातील सुनावणीवेळी त्यांना सोबत घेऊन आल्या होत्या. सुनावणीपूर्वी दीपक ढवळेने सर्वांना चर्चेला बोलावून छोट्या मुलींसमोरच त्यांच्या आईवर बेछूट गोळीबार केला.
या घटनेनंतर घाबरलेल्या मुली पित्याला असे करण्यापासून परावृत्त करीत होत्या. पप्पा, आईला मारू नका, असा आकांत त्या करीत होत्या.
गोळीबार करून पळून जाताना दीपक याच्यावर स्थानिकांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. तेव्हादेखील दीपक व मंजुळा यांना वैष्णवी (वय १२) व तन्वी (वय ८) या दोन मुली मधे आल्या व आमच्या पप्पांना दगड मारू नका, म्हणून जमावाला विनवत होत्या.
त्यामुळेच जमाव शांत झाला व त्याचाच फायदा घेत दीपक ढवळे याने भावासह पलायन केले. आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि वडील जमावाच्या तावडीतून सुटून पळून गेलेला पाहून हतबल मुलींनी आईच्या मृतदेहाजवळ बसून ‘मम्मी, उठ उठ’ असा आक्रोश केला तेव्हा उपस्थितांनाही गहिवरून आले.
लष्करातून निवृत्त झालेला माजी सैनिक दीपक ढवळे याचा पत्नी मंजुळा यांच्याशी कायमच वाद होत होता. मंजुळा ही त्याच्या मामाचीच मुलगी होती. परंतु भांडणाला वैतागून त्या विभक्त राहात होत्या.
पोटगीसाठी त्यांनी शिरूर न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर अनेकदा नोटिसा बजावूनही दीपक सुनावणीसाठी हजर राहात नव्हता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी समुपदेशनानंतर मंजुळा या अंबरनाथ येथे सासरी गेल्या.
मात्र, दोन-तीन दिवसांतच मारहाण झाल्याने त्यांनी पतीसह सासरच्यांविरूद्ध शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. यानंतर त्यांनी पतीपासून संरक्षणाची मागणी देखील केली होती.
पोटगीच्या निकालाची अंतरिम सुनावणी मंगळवारी असल्याने दीपक न्यायालयात आला, तेव्हा पत्नी, दोन लहान मुली व सासूला न्यायालयाजवळील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या आवारात नेले व तेथेच पत्नीला तीन ते चार गोळ्या घातल्या.