अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरुन चारचाकी गाडीतुन पळवून नेवून मारहाण करत एका वयोवृध्दाचा छळ करत गळफास घेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे घडली.
विनायक किसन मडके (वय-६५) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मुलगा तुळशीराम विनायक मडके याच्या फिर्यादीवरुन मुकेश दत्तात्रय मानकर, रुपेश दत्तात्रय मानकर, म्हचिंद्र एकनाथ धनवडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक मडके हे आठ दिवसापूर्वी स्वत:च्या मालकीच्या घोड्यावरुन शेतात जात होते.
यावेळी मुकेश व रुपेश मानकर, मचिंद्र धनवडे यांनी त्यांच्या चारचाकीने हुलकावणी देत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी। ते गावात गेले असता, या तिघांनी त्यांना दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन लाथाबुक्यांनी माराहण केली.
तु आम्हाला पैसे दिले नाहीत तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. वडीलांनी घरी येवून आम्हास हा प्रकार सांगितला. दि.९ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास या तिघांनी घरी येवून वडीलांना जबरदस्तीने त्यांच्या चारचाकी गाडीतून पळून नेले.
त्यानंतर माझ्या मोबाईलवर फोन करुन तुझ्या वडीलांना जीवंत सोडणार नाही असे म्हणत मला देखील शिवीगाळ व दमदाटी केली. वडीलांचा शोध घेण्यासाठी आम्ही गेलो असता गदेवाडी गावाच्या शिवारास धनवडे यांच्या मालकीच्या हॉटेल सुयोग समोर त्यांची गाडी उभी होती.
हॉटलेकडे जावून पाहीले असता हे तिघेजण वडीलांना मारहाण करीत असल्याचे दिसले. त्यानंतर मी घरी येवून मोठा भाऊ गोरख यास हॉटेलवर घेवून गेलो. तेव्हा वडीलांना मारहाण करणारे तेथून निघून गेले होते.
वडीलांचा आसपास शोध घेतला असता हॉटलेच्या पाठीमागील शेतामध्ये बोरीच्या झाडाला ते गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत दिसले. आम्ही त्यांना तातडीने खाली घेवून शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे सांगितले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.